विचार करून कंटाळलो !

विचार करून कंटाळलो !


              कधी कधी मी मराठी  असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा  शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी  लिहिलेल्या

" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"


या ओळींचा नायक असुनही माझ्यावर अशी वेळ यावी ? एखादा कट्टर (?) मराठी माणुस माझ्या मराठी असण्याबद्दल शंकाही घेईल. अस झालच तर हेच लाज असण्याची पहीलं कारण असेल. केवळ विरोधासाठी विरोध केल्यामुळ मन, आचार विचार , प्रगती आणि व्यासंग संकुचित होत जातो हे ज्यांच्या बरेचदा गावी नाही त्यातलाच एक मी आहे. 'आपला तो बाब्या, दुसऱ्याच ते कार्ट' या सूत्रावर ज्यांची अभिरुची ठरते त्याच जातीचा मी आहे. शिवाजी महाराजांचे गुण न घेता त्यांचं फक्त नाव वापरून धिंगाणा करायला उत्सुक गटात मी मोडतो. अर्थात हि सर्व वाक्यं व्यक्तीसापेक्ष आणी स्थळ सापेक्ष आहेत. भारतातल्या प्रत्येक राज्यात जिथे प्रादेशीक अस्मिता बिंबवली जातेय तिथे विचार साधर्म्य असणारे लोक पुष्कळ असतील याची कल्पना आहे. अशा लोकांना माझे काही प्रश्न :


१. प्रादेशीक अस्मिता नेहमी ओढून ताणून का आणली जाते? 

एखादी व्यक्ती देश वा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली की तीच्या पूर्वायुष्याबद्दल खोदकाम सुरु होते. येण-केन प्रकारेण तिचा मराठी वा तत्सम प्रदेशाचा, जातीचा संबंध प्रस्थापित केला जातो. तिच्या ध्यानी मनी असो नसो, तिचं कार्यक्षेत्र मुळ भूमी पासून कुठेतरी दूर असो वा तिचं कार्य भाषा, जात-पात, लिंग या भेद-भावांपासुन अलिप्त असो , तिचा संबंध जसा हाव तसा जोडला जातो. नंतर या नूतन प्रसूत नात्याचा आनंद साजरा होतो - अशा एखाद्या नवीन संबंधाचा सुगावा लागेपर्यंत. या खेळाचे अलीकडील उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. वेंकटरामन रामकृष्णन. आपली कार्यभुमी इंग्लंड असताना, भारताचा व त्यांन नोबेल मिळण्याचा सरळ संबंध नसताना सुद्धा भारताशी त्यांचं नातं जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहून 'आपण भारतीय नाही आहोत' असं त्यांना सांगाव लागण ही शरमेची बाब ना लोकांच्या लक्षात आली ना मिडीयाच्या ! अर्थात हे देश पातळीवरचं उदाहरण झालं. अजून अशी मराठमोळी अनेक उदाहरण देता येतील - रजनीकांत, राहुल द्रवीड, N. Vittal (Former CVC) इ. 

२. शिवाजी महाराजांची (कींवा इतर प्रभूती) जयंती / पुण्यातिथीचं दिवस महात्म्य काय?
प्रश्न - आपल्यावर अन्याय झालाय का? [1]

काय फरक पडतो दिवस कोणता आहे? जयंती / पुण्यतिथी साजरी करताना महत्वाचं त्या पुण्य-पुरुषाच स्मरण. त्याच्या गुणांचं अंगीकरण करण्याचा , वृद्धिंगत करण्याचा दिवस. हे सर्व सोडुन तारखे वरून वाद कशासाठी ? एखादी गोष्ट का व कशासाठी करायची हे माहीतच नसेल तर ' तारीख पे तारीख ' सीनचे रीटेक पुष्कळ व्हायचे. 

३. मी अमुक एक जातीचा - मग मला इतर जातीतील महनीय व्यक्तींबद्दल वावडे का?
प्रादेशीक अस्मिता या बाबतीत काहीच बोलत नाही. ब्राह्मणांच्या कार्यक्रमात शाहु-फुले नकोत आणी दलीत मंडळींना टिळक- सावरकर नकोत. या सर्वांनी देशसेवेत तितकेच प्राण ओतले ना? "Love  s not like a bread...." हा न्याय या सर्वांनाही लागू होतो. या सर्वांची विचार धारणा समानतेची होती तर आपण त्यांची वाटणी का करतो? भांडत बसण्यापेक्षा त्यांचे विचार समजावून का घेत नाही? 

४. अपात्र ठरणे म्हणजे डावलले जाणे वा अन्याय होणे कसे काय? 
आपल्याला मिळाले नाही म्हणजे सदोष पद्धती , अन्यायी व्यवस्था , असमतोल व भेदभाव सर्व ठळकपणे दिसू लागते. हेच उलट घडले तर मात्र स्व-कर्तृत्वाशिवाय दुसरे कारण सापडत नाही. आपल्या अंगी पात्रता आहे का नाही ? आपल्यापेक्षा दुसरा सरस आहे का? नियमाला दिलेली बगल योग्य व न्याय्य आहे का? असारासार विचार न करता, समाज हित न बघता केवळ स्वार्थापायी समाजास व व्यवस्थेस नाचवणे हा संधिसाधू मडळीं चा कार्यक्रम असतो तेव्हा लाज आणणारे प्रसंग घडतात. असे प्रसंग समाजमन व नजर दुषित करतात.  विशिष्ट छटा असलेल्या काचेतून जग त्या रंगाचं दिसतं तसाच हा प्रकार !. आपल्यावर अन्याय होतोय असं लहान सहान  गोष्टी मध्ये देखील वाटण हा त्या वृत्तीचा परीणाम. एक असंच उदाहरण 'लोक मानस' या लोकसत्ते मधील सदरात वाचनात आलं. एका वाचकाने उपस्थित केलेल्या प्रश्नास दुसऱ्या वाचकाने दिलेले उत्तर वाचनीय आहे. चौथ्या प्रश्नास उत्तर म्हणुन सुद्धा मी ते screen shot येथे अपलोड केले आहेत. 
उत्तर : न्युनगंड कसा टाळावा ? [1]

 बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे या सर्व प्रश्नांच उत्तरही एकच आहे - कृतीआधी विचार केला नाही म्हणुन ! विचार न करण्याचं कारण :


 "Give them bread and circuses and they will never revolt…" 





वरील प्रश्न वाचल्यावर काहींच्या मनात प्रश्न येईल - मराठी म्हणवण्याची याला लाज का वाटते ? विजय तेंडुलकरांनी अशा प्रश्नाचं  समर्पक उत्तर आधीच देऊन ठेवलय (रामप्रहर, १९९४ )कारण त्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटायची तेव्हा अनेकांनी तेंडुलकरांना हा प्रश्न केला होता . ते उत्तर त्यांच्याच शब्दात :


"आपल्याला लाज वाटते त्या गोष्टी फार खऱ्या असतात, म्हणुन तर लाज वाटण्याचा प्रश्न येतो. हिंदुंच्या एखाद्या कृतीने किंवा प्रथेने हिंदू असल्याची मला लाज वाटली तर त्याचा अर्थ मी हिंदू असल्यानेच ती मला वाटली आहे ! "


Ref: [1]Lokasatta 20th March 2013 and 30th March 2013.
Image source: http://sphotos-a.xx.fbcdn.net/hphotos-ash3/530037_404306226257263_1258909037_n.jpg

4 comments:

  1. मला वाटतं, "मराठी असण्याची लाज" वाटण्यापेक्षा, काही लोकांचं चुकीच्या पद्धतीने "मराठीपण" गाजवण तुला जास्त त्रास देतय!!! :)

    ReplyDelete
    Replies
    1. Thats absolutely true Ashwin. However when Non-Marathi community looks at it, I am no more different than Marathi. Also this article is applicable to any divide, as I have mentioned in the post.

      Delete
  2. article is good, no doubt about it
    but can u shuffle this comment area with " you may also like"?
    whenever i come across this , it seems like its end of article!

    ReplyDelete
    Replies
    1. TY Suraj for your like and valuable suggestion. Let me see how could make it better. :-)

      Delete

Thank you for visiting !