slots.us.org काही कथा - २ | The Top Post !

काही कथा - २


काही कथा - २
अब्राहम लिंकन यांची एक गोष्ट आहे. ते अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या गावचा स्थानिक तरुणांचा एक गट त्यांना भेटायला येतो. आपल्या गावचा अध्यक्ष झालाय, तेव्हा अभिनंदन करावं हाही हेतू त्यामागे असतोच. पण मुख्य म्हणजे लिंकन यांच्यामुळे आपलाही चरितार्थाचा प्रश्न मिटतोय का ते पाहावं, हा भेटीमागचा खरा उद्देश! 

चहापाणी झाल्यावर लिंकन या तरुणांना विचारतात, 'काय काम काढलंत?' ती मुलं सांगतात, 'नोकरी शोधतोय.. तुम्ही शब्द टाकला तर होईल..' वगैरे. ते ऐकून लिंकन त्यांना म्हणतात, 'मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला..

एक राजा असतो. शिकारीची भारी हौस. असाच तो एकदा शिकारीला निघतो. त्याआधी राजज्योतिषांना विचारून हवामान कसं काय असेल, याचं भाकीत त्यानं विचारलेलं असतं. राजज्योतिषांनी सांगितलेलं असतं, 'उत्तम दिवस आहे शिकारीसाठी.. बेलाशक जा.' 

मग राजा सर्व तयारीनिशी निघतो. सगळं लटांबर असतंच बरोबर. तर हे सगळे जंगलात शिरणार तोच वेशीवर एक गरीब शेतकरी आडवा येतो. आपल्या गाढवाला घेऊन तो घरी परतत असतो. त्या मंडळींची सगळी लगबग बघून तो विचारतो, 
'काय चाललंय?' 
राजाचे सैनिक सांगतात त्याला- 'महाराज शिकारीला निघालेत.' 

त्यावर शेतकरी घाबरून त्या सैनिकाला सांगतो, 'राजांना सांगा- आजचा दिवस फार वाईट आहे. शिकार तर मिळणारच नाहीच; उलट तुफान पावसात कदाचित जंगलात अडकून पडावं लागेल.' 

शिपाई मग हस्ते परहस्ते राजापर्यंत ही बाब कळवतात. राजा संतापतो. आपल्या शिकारी मोहिमेला अपशकुन करणारा हा कोण फडतूस शेतकरी? राजा फर्मावतो.. 'तुरुंगात टाका त्याला आणि चांगले फटके मारा.'

त्याप्रमाणे शेतकऱ्याला अटक होते. राजाचा लवाजमा पुढे निघतो. मध्यान्ह होते. राजा जंगलात अगदी ऐन गाभ्यात पोचतो- न पोचतो तोच ऊन गायब व्हायला लागतं. बघता बघता आकाशात काळ्या ढगांची दाटी होते आणि चांगलाच पाऊस कोसळू लागतो. साहजिकच राजाच्या शिकारी मोहिमेवरही पाणी पडतं. राजा हात हलवत परत येतो. त्याला आता आपल्या राजज्योतिषाचा राग आलेला असतो. 'दिवस चांगला असेल,' असं ज्योतिषी म्हणाले होते. मग अचानक पाऊस कसा आला? त्याचवेळी त्याला हेही आठवतं, की जंगलाच्या आधी भेटलेल्या शेतकऱ्याला मात्र बरोबर पावसाचा अंदाज होता. पण त्याला मात्र आपण तुरुंगात टाकलं. राजा प्रधानाला आज्ञा देतो- 'त्या शेतकऱ्याची सुटका करा. त्याला माझ्या समोर घेऊन या. आणि राजज्योतिषाला तुरुंगात टाका.' राजाच्या आज्ञेचं पालन होतं आणि सैनिक त्या शेतकऱ्याला राजासमोर दरबारात हजर करतात. भीतीनं गांगरलेला असतो तो. आता आपल्यापुढे आणखीन काय वाढून ठेवलंय, याची काळजी असते त्याला. 

त्याची केविलवाणी अवस्था पाहून राजा त्याला अभय देतो आणि म्हणतो.. 'त्या दिवशी दुपारी पाऊस पडेल, हे तुला कसं कळलं?'
शेतकरी गांगरतो. म्हणतो, 'खरं सांगतो- ते मला नाही कळलं.'
'मग तू पावसाचा अंदाज कसा काय वर्तवलास?' राजा विचारतो.
'ते माझ्या गाढवाला कळलं..' शेतकरी म्हणतो.

'गाढवाला..?' राजाचा आश्चर्यचकित प्रश्न- 'ते कसं काय?'
'पाऊस पडणार असेल तर काही तास आधी गाढवाचे कान खाली पडतात.. लोंबायला लागतात. ते त्या दिवशी तसे होते, म्हणून मी अंदाज व्यक्त केला पावसाचा.'
राजा ते ऐकतो आणि आदेश देतो- 'आजपासून राजज्योतिषीपदी या गाढवाची नियुक्ती केली जात आहे..'
ही गोष्ट लिंकन सांगतात आणि म्हणतात, 'तेव्हापासून एक झालं..' 
आणि थांबतात.
उपस्थित तरुण साहजिकच न राहवून विचारतात- 'काय?'

लिंकन म्हणतात, 'तेव्हापासून प्रत्येक गाढवाला आपली राजज्योतिषीपदी नेमणूक व्हावी असं वाटू लागलं..'
याचा काय तो योग्य अर्थ त्या तरुणांना कळतो. ते मुकाट निघून जातात.

'शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पंडित: | 
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||' 
-----------------------------------------------------------

एकदा एका राजाकडून काहीतरी प्रमाद घडला आणि त्याचं प्रायश्चित म्हणून एक दिवस याचक होऊन ‌भिक्षा मागण्याची शिक्षा त्यास मिळाली.

त्याप्रमाणे राजा भिक्षा मागण्यासाठी सकाळी सकाळी राजपथावर आला. त्याचवेळेस समोरून एक भिकारी ही भिक्षा मागायला त्याच वाटेवरून येत होता. त्यानं राजाला पाहिलं. आता राजाकडे भिक्षा मागून आपल्याला आपलं दारिद्र्य कायमचं दूर करता येईल, असा विचार त्याच्या मनात आला. काय मागावं याचा तो विचार करत असतानाच राजा त्याच्यासमोर आला. राजानं भिक्षेसाठी हात पुढे केला.

राजाचं ते याचकाचं रूप बघून त्या भिकाऱ्यानं आपल्या कर्माला दोष दिला आणि आपल्या झोळीतील चार दाणे राजासमोर टाकले. निराशेनं घरी येऊन त्यानं झोळी फेकली. आणि आश्चर्याने तो बघतच राहिला.

त्याने जेवढे दाणे भिक्षा म्हणून दिले होते, फक्त तेवढेच दाणे सोन्याचे झाले होते! सर्वच दाणे राजाला का दिले नाही म्हणून तो स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिला !

-----------------------------------------------------------------------------------------

एकदा एक प्रांतप्रमुख प्रवासाला निघाला. वाटेत लाओत्सु यांचा आश्रम होता. त्यांना वंदन करावे आणि जमेल तेवढे ज्ञान ओंजळीत घ्यावे या हेतूने तो आश्रमात आला. ' राज्यकारभारात व्यस्त झाल्यामुळे माझ्याजवळ सत्संगासाठी वेळ उरत नाही. मला आपण एक-दोन वाक्यात धर्माचे सार सांगू शकाल का ?' त्याने लाओत्सुंना विनंती केली.

लाओत्सु उत्तरले ' अवश्य सांगेन! हे सारं फक्त एका शब्दात सामावलं आहे. ' तो चकित झाला. ' कोणत्या ?'

लाओत्सु म्हणाले , ' मौन. '

त्याने विचारले , ' मौनाचे उद्दिष्ट काय ?' लाओत्सु म्हणाले , ध्यान. ' आणि ध्यान म्हणजे ?' लाओत्सु पुन्हा म्हणाले मौन. ज्यांना मौन साधलं त्यांचं निरीक्षण केलं तर जाणवतं त्यानंतर निर्मिलेली प्रत्येक गोष्ट , बोललेला प्रत्येक शब्द भयमुक्त असतो , खरा असतो , त्यात लोभ नसतो , अस्वीकृतीचा त्रागाही नसतो. (Source Maharashtratimes)

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !