Pages

एका 'प्रेमाची गोष्ट' - A film review


एका ' प्रेमाची गोष्ट ' - A film review


अत्यंत आटोपशीर कथा, रेखीव व्यक्तिरेखा , सर्वांग सुंदर अभिनय व तांत्रिक दृष्ट्या चपखल झालेला हा चित्रपट. बाजारात तरल प्रेमकथा हजार येतात, काही 'दिलवाले ….' आणी काही …। असो. हि कथा दिलवाल्यांची.

कथा:

अतुल कुलकर्णी (राम) सरळ साधा, आशावादी मराठी चित्रपट लेखक. आपसातील अनबनीमुळे त्याची बायको, रोहिणी तळवळकर  (रागिणी), सोडुन चाललेली आहे स्वत:च करियर करायला. दोघांच्या वाटा वेगळ्या होतात. आपली काहीही चूक नाही हे माहीत असून देखील, ती एके दिवशी परतेल या भावनेतून पडतं घेणारा  राम या सर्वाचा परीणाम  न होऊ देता लेखनाकडे वळतो.
ऑफिससाठी हव्या असणाऱ्या असोशिएट ची जागा मिळते सागरिका घाटगेला (सोनल). हाती येईल ते काम करता करता रामला त्याने लिहिलेल्या कथेसाठी प्रोडुसर मिळतो आणी खऱ्या अर्थाने भावनिक गुंतागुंत सुरु होते. या संधीकडे एक नवीन सुरुवात म्हणुन पहात असताना नेमकं याचवेळी - सोनलच लग्न झालय - हे रामला कळत. तिकडे सोडुन गेलेल्या रागिणीला आपली चूक कळते व रामाला वाटत की रागिणी साठी थांबण्यात काहीही अर्थ नाही. रामची आई व  मित्र रामला तर सोनलची मैत्रीण (मीरा) सोनलला एकमेकांबद्दल उत्पन्न झालेल्या प्रेमाची जाणीव करून देतात.

कळतय पण वळत नाही अशी एकंदर परिस्थिती. राम, सोनल व रागिणी यांचा त्रिकोण वर्तुळ बनून गोल गोल फिरू लागतं. राम लिहित असलेली कथा हीच चित्रपटाची एका प्रेमाची गोष्ट आहे हे प्रेक्षकांसकट पात्रांनाही कळून चुकत! शेवटी कोण कोणाबरोबर जाणार हे बघायला प्रेक्षकांनी मात्र चित्रपटगृहात जायला हवं.

माझं मत:

हा चित्रपट एक जमलेली भट्टी आहे. सगळच उजवं. मराठी मध्ये चांगल्या प्रेमपटामधे या चित्रपटाचा समावेश आवर्जून व्हावयास हवा. एक प्रोफेशनल चित्रपट कसा असावा याचे उत्तम उदाहरण. अलिकडे पाहिलेल्यांपैकी तांत्रिक दृष्ट्या सरस चित्रपट.

कथावस्तू जुनी असली ( शेक्सपियरच्या A Midsummer Night's Dream वर आधारीत) तरी फ्रेश संवाद, हलके विनोद पटकथा सहज सोपी करतात. कथेतील गुंतागुंत कुठेही डोक्याला झिणझीण्या आणत नाही. योग्य गतीने पुढे सरकणारी कथा प्रेक्षकाला जखडून ठेवते आणि  दिग्दशकाचं काम सोपं करते. पार्श्वसंगीत आणी सुरेल शब्द असणारी गाणी मन ओलावून जातात.  तिन्ही गाणी अप्रतीम संगीतबद्ध केलेली व ताकदीने गायलेली. रंगसंगती (कपडेपट, सेट) आणी प्रकाशासंगती  डोळ्याला सुखावते. सर्वांचा अभिनय उत्तम, विशेषकरून अतुल कुलकर्णीचा. तो पडद्यामागे सुद्धा रामच असावा असं वाटण्याइतका नैसर्गीक अभिनय झालेला आहे. प्रमुख तीन पात्रांशिवाय इतरांचा मोजका वावर चित्र बांधून ठेवतो, अघळपघळ होऊ देत नाही. रोहिणी हट्टंगडीची आईची भुमीका लक्षात ठेवून जाते. चूक शोधायचीच म्हटली तर नवोदित (मराठीसाठी ) सागरीकाची संवादफ़ेक. नक्की माहीत नाही, पण बहुतेक डबिंग दुसरीने केलेलं आहे, निदान असं वाटत तरी. म्हणून सर्व गडबड असावी.

प्रत्येकाचे, विशेषत: दिग्दर्शकाचे,सतीश राजवाडे यांचे, परिश्रम दिसतात. कारण ते सफल झालेत म्हणुन. थोडक्यात सांगायचं तर, एका प्रेमाची  गोष्ट एकण्यासारखी नाही पहाण्यासारखी आणी अनुभवण्यासारखी आहे. 

" ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना !……… "

Quick facts:

Title: Premachi Goshta (2013)

Language: Marathi 

Directed by Satish Rajwade. 

Starcast: Atul Kulkarni, Sagarika Ghatge, Rohini Talwalkar, Satish Rajwade, Rohini Hattangadi etc

My rating: 3 out of 5.





No comments:

Post a Comment

Thank you for visiting !