Pages

पत्रातले शब्दनाते

पत्रातले शब्दनाते


लेखनाचा विषय जर पत्र असेल तर सुरुवात ही - 'आजच्या या इंटरनेटच्या युगात' - अशीच होते. कारण इंटरनेटच्या आवाक्यामुळे, सुलभते मुळे रुढ अर्थाने पत्र लिहिणे मुळी बंदच झालाय असं कित्येकांना वाटत. तात्विक दृष्ट्या बरोबर असलं तरी मला ते तितकस बरोबर वाटत नाही. उलट पत्र लिहिणं वाढलय, सोप्प झालय. ई-मेल, फेसबुक, ट्विटर वापरून आपण दररोज अनेक पत्र लिहित असतो, आपल्याच नकळत. यांच स्वरूप मात्र शाळेत शिकवलं  जाणाऱ्या साचेबद्द, मायना असलेल्या पत्रांसारख नसत इतकच. हि ई-पत्र मिळतात ही पटकन - एका क्लिक सरशी.

असे काही भौतिक फरक सोडले तर उरतात ते भावनिक फ़रक, खुपसारे. पूर्वीसारखी ही पत्र अचंबित करणारी, आतुरतेने वाट पाहायला लावणारी उरली नाहीत. त्यातला प्रेमाचा ओलावा डिजिटल पत्रांना येत नाही. हटकून होणारे शब्दप्रयोग उदा. शि. सा. न. वि. वि. , लहानांना गोड गोड पापा, कळावे लोभ असावा, हे सर्व कधीच हरवलेत. जिथे आवश्यक शब्द आपली कुकुली रुपं घ्यायला लागलेत तिथे ही  लांबलचक शब्द्वजा वाक्य कोण लिहीणार.

बरं, ही नवीन पत्रही आपसुख येउन पडलेली असतात, जेव्हा पाहिजे तेव्हा वाचा. नको ती पत्रच जास्त - स्पॅम मेल या गोंडस  नावखाली मग फ़िल्टर केली जाणारी.  पोस्टमन सारखी यांची कोणतीही ठरलेली वेळ नाही. बाकी  कुणाची नाही एवढी वाट पोस्टमनची बघितली जायची, खासकरून एखादं पत्र अपेक्षित असेल तेव्हा.   पोस्ट बंद झाली तर अशी बरीचशी गुपितं, गुपितच रहाणार. असो. बर, पोस्टमन दिसला की आपसुख प्रश्न व्हायचा - "काही आहे का, पत्र वगेरे ? ".  बऱ्याचदा ठरलेलं उत्तर ऑफ़िशियली मिळण्यासाठी केलेली प्रश्नोत्तर एक पूर्तता असे. महिन्यातून पंचवीस दिवस तरी त्याच्याकडे आपलं पत्र नसायचच.



प्रेमपत्राबाबत मात्र मला बऱ्याच शंका आहेत. खरच ही पत्र लग्न ठरलेलं नसताना (शुद्ध भाषेत फक्त लफ़डं असताना) पाठवली जातात का हो? समजा इतर पत्रांबरोबर 'ते' पत्र सुद्धा घरात मिळाले आणि कुणी त्याचं जाहीर वाचन केलं तर काय होईल, हे विचार करण्याची  साधी अक्कल तरी आंधळ्या प्रेमाला असेल अशी किमान अपेक्षा. त्यामुळे प्रेमपत्र हा प्रकरण आणी संबंध एकंदरीतच मला बादरायण वाटतो. गुलाबी पाकीट, त्यांना येणार अत्तराचा वास हे कोण्या Fantasy कथालेखकाचं काम अस्साव अशी मला दाट शंका येते.

ई-पत्र हि ख्याली खुशाली करण्यासाठी फार कमी वेळा विचारली जातात. फेसबुक वर तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील copy-paste असतात. एकदा 'Happy birth Day' टाईप करा बस झाल. ज्याला शुभेच्छा देतोय त्याच नाव सुद्धा न लिहिता दिलेल्या कोरड्या शुभेच्छा. ज्या वेळी खूप महत्वाचं काम असेल तर फोन आहेतच. विशिष्ट संदेश फार कमी वेळा पत्राने / तारेने पाठवले जातात. त्यात तार सेवा तर आता बंदच झाली य.
इतक सारं असलं तरीही, माझा मते, पत्रव्यवहाराच्या बरयाचश्या सनातन बाबी न टाळता इंटरनेट वर इंटरनेट प्रचलीत पत्रव्यवहार करता येण शक्य आहे. अर्थात वेळ  नसलेल्या व्यक्तीकडून कोणत्याच प्रकारचा पत्र व्यवहार अपेक्षित नाही.

अशीच एक पत्र देवाण घेवाण- फेस बुक वरचे  -


  • Sujata Babre Phadke

    प्रिय मित्र परेश यास शुभाशीर्वाद !! तुझ्या ब्लॉग वरील अभिप्राय म्हणून एक छान पत्र लिहावेसे वाटत होते पण पाठवणार कुठे ??? आज हे पत्र ( ब्लॉग वर comment नाही ) म्हणूनच वाच. पत्रलेखन, postcard लिहिणे दुर्मिळ होत चाललय.
    तुझा वैविध्यपूर्ण ब्लॉग वाचून अन छायाचित्रण पाहून मी नि:शब्दच झाले. एक व्यक्ती नानाविध विषयांवर सुंदर, ओघवत्या भाषेत इतके खुलासेवार कशी बरे लिहू शकते !!! तुम्ही विज्ञान / तंत्रज्ञान क्षेत्राशी संबधित असून निसर्गाची आवड व मैत्री, काव्यरचना करणे हे पाहून मी अचंबित झाले. हे सर्व माझे प्रिय विषय !! कुसुम्बाच्या झाडाचा फोटो असो पोखरा लेक व त्यावरील कविता सारेच अप्रतिम !! HDRimages , drongo चा सोनेरी झळाळनारा फोटो उत्कृष्टच....
    Dwarf powder puff ला मराठी नाव आहे का ? माझ्या आई च्या कडून त्याला शतमुखी असे बंगाली नाव आहे असे ऐकले होते. हे तर नुसते नामोल्लेख...काय काय लिहू आणि कश्या कश्या बद्दल .......
    फुलपाखरे त्यांचे वर्णन , फोटो सगळेच अवर्णनीय !!!!!
    एक रसिक, सृजनशील, संवेदनशील मन लाभलाय तुला. ...!!!!!!
    हे सर्व वाचक वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी जी कळकळ, तळमळ दाखवलीस, अपार कष्ट घेतलेत त्याला तोड नाही. हा सर्व खजिना मला प्रेमाने दाखविलात त्यासाठी मी ऋणी आहे.
    तशी मी परकी अन अनोळखी तुमच्यासाठी .....पण तुम्हा उभयताबद्दल बोलायचे म्हणजे लक्ष्मीनारायणचा जोडा ,विधात्याने तुम्हा एकमेकांसाठीच जन्माला घातले असावे असे वाटते.
    सोज्वळ , सात्विक, राजस अशी सौ.मेधा ची छबी खूपच आवडते. तुम्हा दोघानाही पुढील सहजीवनाच्या प्रवासाकरिता मन:पूर्वक शुभेच्छा . सर्वार्थाने मोठे व्हा ..छान नावलौकिक मिळवा....!!! आयुष्यातील प्रत्येक क्षण समरसून जगा....!!!!
    तुम्ही लिहित राहा आम्ही आनंदे वाचत राहू. लिखाण ~~~ वाचनाची हि दिंडी निरंतर सुरु राहो .
    आपल्यातील मैत्रीचा हा स्नेहदीप सदैव तेवत राहावा.........
    घरातील आ. वडीलधार्या व्यक्तींना माझा अनेक साष्टांग नमस्कार !!!
    चि. सौ. मेधास गोड शुभार्शिवाद.
    भावनेच्या भरात काही चुकले असेल तर माफ करावे.
    सौ.सुजाता शशांक फडके




  • Paresh Kale

    सौ. सुजाता यांस , स.न.वि. वि.
    सर्व प्रथम या सविस्तर उत्तराबद्दल, वाखाणणी बद्दल धन्यवाद. जर पत्र लिहावेसे वाटते अस आधी सांगितलं असतं तर मी नक्की पत्ता दिला असता.इतके सुंदर पत्र खरोखरचे वाचायला कुणाला आवडणार नाही. असो पुन्हा कधीतरी.
    मी तुम्ही पाठवलेला संदेश लगेच वाचला होता, आणि त्यानंतर बरेचदा वाचला. एकीकडे मनाला खूप बरं वाटत होतं आणि दुसरीकडे वाटत होतं कि खरचं आपण एवढं चांगलं लिहितो का ? पण ज्याअर्थी तुम्हाला ते आवडलं त्या अर्थी त्या लिखाणात काहीतरी चांगलं आहे. आता अर्थातच माझी जबाबदारी खूप वाढलीय व अजून उत्तम देण्याचा माझा प्रयत्न असेल.
    मी इंजिनियर व्हायचा नव्हतो. माझा मुळ ओढा कला शाखेकडे. पालकांच्या मनासाठी बी इ झालो. वेळ मिळावा म्हणून आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टी दुसर्याला देण्याच्या प्रवृत्ती मुळे शिक्षक बनलो. चांगला शिक्षक बनण्यासाठी पि एच. डी होतोय इतकच. कदाचित या सर्व बाबींमुळे लिखाण होत असेल. वाचनासाठी कुठलाच विषय अस्पृश्य नसल्यामुळे वैविध्य राहिलं.
    फेसबुक मार्फत आपण मित्र झालो. तुम्ही केलेली पोस्टिंग बघूनच मी ब्लॉग रिव्ह्यू साठी तुम्हाला आमंत्रित केलं. फार कमी जणांना मी निमंत्रण पाठवलं होतं. तुमच्या बाबतीत माझा निर्णय योग्य ठरला याचा मला फार आनंद होतोय. या पत्रामुळे तुमच्या बद्दलचा आदर आज अजूनच वृद्धिंगत झालाय.
    सौ मेधानेही हा संदेश वाचला. तिलाही खूप आनंद झालाय. तिने तुम्हाला धन्यवाद दिलेत.
    सरतेशेवटी एक -दोन विनंती आहेत , मी हे तुमचे पत्र माझ्या ब्लॉग पोस्ट मध्ये उपयोग केल तर चालेल का? दुसरी गोष्ट, ब्लॉग मध्ये काही त्रुटी असल्यास जरूर कळवणे.
    तूर्तास इतकेच. खूप लिहायचं आहे, बाकीचं ब्लॉग साठी राखून ठेवतो लहानाना आशीर्वाद, मोठ्यांस साष्टांग नमस्कार.
    श्री. परेश गोविंद काळे,
    बदलापूर.



  • Sujata Babre Phadke

    प्रिय मित्र परेश यास शुभार्शिवाद !!!!!! तुझ्या पत्राची अनेक वाचने झाली परंतु उत्तर देण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व.
    अनपेक्षित पत्र आले अन खरच आपले जवळचे कुणीतरी भेटले ह्याचा मनसोक्त आनंद लुटला. प्रथम मी वाचले ,पुन्हा आम्ही उभयतानी सामुहिक वाचन केले.
    ज्या आपलेपणाने पत्र लिहिलेस त्याच खास खास कौतुक.......!!!!
    आता तुझ्या विनंती बद्दल..... मी अगदी साधे सरळ लिहिणारी , मनात आले ते कागदावर उमटवणारी.....तुझ्या इतके सुद्धा सुरेख भाषाशैली नसणारी !!!! तुला माझे पत्र ब्लॉग पोस्ट मध्ये योग्य वाटतय का ??? जर योग्य असेल तर त्याचा उपयोग जरूर कर .
    प्रापंचिक जबाबदाऱ्या अन व्यवसायाची व्यस्तता ह्यातच वेळ झरकन निघून जातो. लिहावेसे असे खूप वाटते पण खरे सांगू का मला मराठी टंकलेखन भरभर जमत नाही. तसेच संगणकासमोर स्थिर होऊन बसावे लागते... 
    पण भावना व्यक्त करायला आपली मायमराठीच हवी...........!!!!
    वेळेअभावी आटोपते घेते. चि. मेधास सांगणे कि मी तिचे नाव """ मधाली"""
    ( मधाची बुधली ) असे माझ्याकडून बदलले आहे. तिला तिच्यासारखाच गोड शुभार्शिर्वाद !!!!
    घरातील सर्व वडीलधार्या मंडळीस माझे अ. सा. नमस्कार!!!
    तुझा एकेरी केलेला उल्लेख खटकत नाही ना ???
    मी वयाने मोठी असून मला एकगोड नात आहे...""" जुई """
    कदाचित फोटोत मी लहान भासत असेन 
    सौ. सुजाता शशांक फडके


2 comments:

  1. खुप छान
    अशी मराठी हल्ली वाचायला मिळत नाही
    दोघांना धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुरज ! अजून काही अशी पत्र मी टाकणार आहे ! वाचत रहा :-)

      Delete

Thank you for visiting !