Pages

Wandering Destination: Vivid Konkan - III

अतरंगी कोकण (Vivid Konkan - III)


कोकणात फ़िरायचं म्हणजे कपडे सांभाळून चालणारया , त्यावर एकही डाग न पडण्याची काळजी घेणारया, चिखलाला घाण मानणारया, न भिजण्यासाठी छत्री सावरणारया लोकांचं काम नव्हे. कोकणातल्या अस्सल पावसाळी वातावरणाची मजा लुटायची म्हणजे हे सर्व वर्ज्य. कुणालाही बरोबर न घेता, सरळ चालत सुटावं, सगळे पाश विसरुन. तरच या वाटा वेगळ्या भासतात, सोबत करतात, एका वेगळ्या जगात नेतात. कोकणातल्या वाटा कधी कुठे घुसतील याचा नेम नाही. गर्द झाडीतून अचानक त्या सड्यावर येतील तर कधी पाणथळ जागेत बागडतील. या वाटा "सरळ वळणाच्या" कधीच नसतात आणी बरयाचदा चालणारया माणसाची वाट लावणारया. भात शेतीतील वाटेवरुन जाताना आणी गुरा-ढोरांनी मळण घातलेल्या वाटा तुडवताना सर्कस करणं टाळता न येण्यासारखं. मात्र योग्य मोसमात यातल्या प्रत्येक वाटेच्या प्रत्येक वळणावर काहीतरी अनपेक्षित दिसतं, सर्व त्रासाचा विसर पाडण्यासाठी. मग ते तणतणीच्या फुलावर बगडणारं फुलपाखरू असो वा अनाहुतपणे माणसाला पाहून झाडीत लपणारा एखादा पक्षी / प्राणी. कधी प्रचंड वाढलेले वटवृक्ष सामोरे येतात तर कधी रानफुलांची चादर लेऊन आपल्याच मस्तीत असलेली माळरानं. 



एखादी वाट चालू लागली की मग किती डोंगर पार केले आणी किती वाड्या, किती शेतं हे तिचं तिलाच ठाउक असतं. सभोवतालचं निसर्ग सौंदर्य डोळ्यांनी टिपावं की कॅमेरात कैद करावं, हे कोडं मलातरी अजून सुटलेलं नाही. यावर माझा उपाय म्हणजे तीच तीच वाट परत परत तुडवावी. प्रत्येक वेळी तिचं नवं रूप दिसणारे एवढं अनुभवावरून सांगतो. वाटेल तेव्हा थांबावं, नटलेल्या सृष्टीला  अमर्याद न्याहाळावं व हवे तेवढे फ़ोटो घ्यावेत. मातीचा, गवताचा, फुलांचा सुवास आपल्या चिमुकल्या छातीत साठवण्याचा प्रयत्न अपुरा पडला की एक दीर्घ श्वास सोडुन पुढं निघावं. 



वाटेवर हमखास भेटणारे व्यक्तिमत्व म्हणजे लहान सहान ओढे. होय ! या ओढ्यांना स्वत:च व्यक्तिमत्व असतं. प्रत्येकाचा प्रवाहाचा बाज वेगळा, वाहण्यातली ऐट वेगळी. संथपणे वहाणारया पाण्याला मधेच अरेरावी सुचते व तो मोठा खळाळणारा आवाज करत पुढे जातो. सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला आपला हातभार लावत हा पुढे जात असतो. कधी भात शेतीला पाणी दे तर कधी बंधारया वर थांबून थोडा आराम कर. वेळ झाली की आळस झटकून एका उंच उडी सरशी पुढची वाट पकड. ह्याच्या व्यक्तिमत्वामुळेच ह्याच्याशी मासे, फ़ुलं, शेती अगदी ओढा पार करणारी माणसं सुद्धा क्षणिक लगट केल्याशिवाय रहात नसावीत. इतर ओढे, छोटे असोत वा मोठे, त्यांच्याशी मैत्री करण हेच त्याच्या मोठेपणाचं महत्वाचं लक्षण. इतरांना त्यांच्या सध्या स्थितीत बरोबर घेऊन जाणारी माणसच भविष्यात सागरा एवढी मोठी होतात. ह्या ओढ्यांमुळेच वातावरणाला जिवंतपणा येतो असं मला वाटतं. शेवटपर्यंत ओढ्याशेजारी हिरवळ  बहरलेली  असते इतरत्र नाहीशी झाली तरी, ते ओढ्याच्या लाघवीपणामुळेच. हे ओढे पुढे नदीचे रूप धारण करतात व  समुद्राला मिळतात, एक मोठा प्रवास संपतो ! नदी, तिचा प्रवास व या प्रवासादरम्यान तिच्या आजूबाजूचा निसर्ग  यातील नेमका संबध अत्यंत कमी शब्दांत मांडलेली गदिमांची एक कविता, माहेरची ओढ,  इथे उद्धृत  कराविशी वाटते …. 

काय रे सांगु बापांनो, तुम्ही आंधळ्यांचे चेले 
नदी माहेरासी जाते म्हणुनीच  चाले 

सारे जीवन घेतो नदीचे पोटात सागर 
तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर 

डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन 
नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन 

पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगर आणी येतो पावसाळा

एकंदर या रम्य पणात पार्श्वसंगीत देणारया निसर्गाकडे एक प्रचंड मोठा ऑर्केस्ट्रा असतो. सिनेमातल्या सारखं याचं आस्तित्व दिसत नसतं मात्र दृश्याला संजीवनी देण्याचं काम हाच जादुगार करत असतो. आवाजाची ही दुनिया स्वतंत्र अभ्यासाची आहे. हलकेच आलेली झुळुक वार्धक्याने जीर्ण पानामध्ये नव चैतन्य असल्यासारखी सळसळ आणतो. बंधाऱ्यावर डोलत असलेली फुलं झुलताना, पानांशी मिळुन एक वेगळाच सौम्य सूर लावतात. ओढा थोड्या थोडया अंतरावर आपला ताल आणी लय दोन्ही बदलत "ड्रामा" जिवंत ठेवतो. प्रत्येक पक्षी / प्राणी वेगळा आवाज काढतोच, तेही प्रसंगानुरूप वेगवेगळे. शमा सारखा पक्षी इथला प्रमुख नकलाकार. हा एकटा पक्षी जवळपास विसेक निरनिराळ्या पक्षांचे आवाज काढून स्वत:ची कलाबाजी सिद्ध करतो. नशीब असेल तर क्वचित मोराची एखादी आर्त केकावली. जवळपास बांबूची बेटं असतील तर हमखास प्रभाव पाडणारा डरावना इफेक्ट घाबरवतोच. 



या सर्व शो मध्ये रंगत भरते ती पावसामुळे. 
अवचित समोर गर्जत आलेले काळे ढग, घेऊन येतात निसर्गाचा मास्टर-स्ट्रोक. हळुहळु जोर वाढवत जाणार हा पाउस सिम्फनीला क्लायमेक्सकडे नेतो. वाढत जाणारा आवाज, ज्या गोष्टीवर पडतोय त्याप्रमाणे बदलणारी त्याची पडघम मनात ओलावा करून जाते. अशावेळी आपण मात्र शांतपणे एखादं चिंचेचं वा वडाचं झाड शोधावं आणी आसपासच्या आवाजाची दुनिया माहीत करून घ्यावी. गजकर्णी सारख्या मोठ्या पानाच्या झाडांवर थेंबांची टपटप, वारयाच्या झोतामुळे सरीने घेतलेला आलाप, पानांवरून पाण्यात गळणारया थेंबांचे जलतरंग. दूर एखाद्या पत्र्यावरती होणारी टपटप, हिरव्यागार शेतीतली सळसळणारी तृणं, एक ना अनेक. मधेच एखादी विद्युल्लता जणू तबल्यावर पडलेली जोरदार थाप कशी वाटते. हे सर्व क्षण कॅमेरात फ़ोटो म्हणून नाही पकडता येत असले तरी यांचं व्हिडियो चित्रण मात्र करता येतं, अर्थात त्यात तेवढी मजा नाही व वेळ पण जातो. त्यापेक्षा झाडाखाली उभं राहून अंगावर पडणारे टपोरे थेंब हातात गोळा करण्याचा वायफळ प्रयत्न करणं केव्हाही उत्तम. आवाज बरा असला नसला तरी  "मिले सूर मेरा तुम्हारा …. " चा सूर अगदी भिमसेनजीची नक्कल करत आळवण्यातला आनंद अवर्णनीय. अर्थात मनातला मनात न ठेवता, उन्मुक्तपणे, कसलीही भीड न बाळगता. अशा वातावरणात भैरवी केवळ हुरहूर नाही तर एक प्रकारची प्रसन्नता देखील देते




वरुणराजाचा जोर ओसरला तरीसुद्धा हे संगीतमय वातावरण आपल्याच मस्तीत असतं. तारुण्याने मुसमुसलेल्या तरुणीचं भान थारयावर नसतं तस्सच काहीसं. फुला-पानांच्या सहाय्याने हे संगीत अजून थोडावेळ असंच चालू असतं, पुढली सर येईपर्यंत. निसर्गाची हि लेणी एकमेकांच्या संगतीत नटतात, फ़ुलतात, मुक्तपणे बागडतात, व आनंदाची उधळण करतात. परताव्याची अपेक्षा न करता. अर्थात त्यासाठी खूप मोठी दानत आणि कलेजाही लागतो - निसर्गाकडे असलेल्या या दोन्ही गोष्टींची माणुस कल्पना देखील नाही करू शकत ! बोरकरांनी "झाडें झाली निळीं निळीं " या कवितेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा फरकच असावा कदाचीत. 


शांताचिया वृष्टी मधें अशी अद्भुताची सृष्टी, 

कां या लावण्यांतही मी असा सुखानेही कष्टी ?



2 comments:

Thank you for visiting !