Pages

बामणघळ , हेदवी

Hedvi beach, near BaamanGhal (Natural slit due to erosion by sea waves named after local priest)


Way towards the natural slit

बामणघळ , हेदवी 

वेळणेश्वरच्या शांत, सुंदर किनारयावर सकाळ घालवल्यावर मी निघालो हेदवीकडे. तिथल्या प्रसिद्ध दशभुज गणेश मंदिराला भेट देण्याआधी मी निसर्ग प्रेमींसाठी एक वेगळं , अनोखं आकर्षण असलेल्या " बामण घळीकडे " जायचं ठरवलं, कारणं दोन : मला पुढे जयगडला जायचं होतं व मंदिर या रस्त्यावरच होतं. त्यामुळे माझा वेळ, कष्ट व पेट्रोल सर्वच वाचणार होतं. दुसरं म्हणजे सकाळची वेळ बामणघळीवर घालवणं जास्त तार्किक होतं, छायाचित्रणाच्या दृष्टीने !





"उमा महेश " मंदिर

Uma Mahesh temple near the beach
बसक्या घरांनी साथ दिलेला, हेदवी गावातून माडा पोफळी च्या बागांमधुन जाणारा तांबडया मातीचा रस्ता हलकेच थांबतो तो हेदवी बीच वर. उजव्या बाजूला आटोपशीर असं सुरुच बन आणी डाव्या बाजूला छोटासा डोंगर. याच डोंगराच्या पायथ्याशी, समुद्राच्या लाटा छाताडावर झेलणारया काळ्या जांभ्या दगडांनी वेढलेले, आहे ते लहानसच मात्र उठावदार "उमा महेश " मंदिर ! अर्थात मंदिरापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे ती या मंदिरा मागची बामणघळ. देवळाच्या मागल्या  बाजूला जी वाट जाते ती एका वेगळ्याच भौगोलिक आश्चर्याकडे !
Surroundings of Uma-Mahesh temple and Hedvi beach



THE slit

उंच माझा झोका…. 

पावसाळ्याचे दिवस संपल्यामुळे इथले दगड करडे होते व शेवाळाचा प्रभाव मोजक्या ठिकाणी होता. पावसाळ्यानंतर या डोंगरावर आजूबाजूला शेवटच्या तुकडीतली  कुर्डू, सोनकी व इतर बरीच फ़ुलं हवेवर डोलत होती. देवळाच्या पाठीमागे जी एक पाउलवाट या फुलातून, खडकांमधून पुढे जाते ती घळिकडे ! या डोंगराच्याच पायथ्याशी दगडांवर पाणी आपटून, वर्षानुवर्षे होणारया झिजेमुळे एक चिंचोळी घळ तयार झाली आहे. मोठ्या खडकामध्ये साधारण दिड-दोन फुट रुंदीची ही भेग, तळात मात्र खूप रुंद आहे ज्यामध्ये लाटा शिरतात. लाटा जोरात असतील तर पाणी या घळीत जोरात शिरतं आणी घळीच्या शेवटाकडुन उंच उडतं ! हा फवारा योग्य वेळेस १५- २० फुटापेक्षाही जास्त असू शकतो, अर्थात हे बघायला योग्य वेळ साधायला लागते. हि वेळ नाही साधली तरीही या जागेचं महात्म्य कमी होत नाही ! वेगाने येणारया, बेभान झालेल्या लाटा खडकांना आपटून उसळतात… शुभ्र फेस पाण्यावर पसरतो. खूप दुरून, विरहाने सतावलेली प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मिठीत शिरताना जशी धडकेल तशीच हि लाट वागते. उंच उसळलेली लाट हा या नाट्याचा जणू परमोच्च बिंदु.
Top view of the slit, water wave rushes through the open space beneath the rocks


हिरे उधळणाऱ्या लाटा कॅमेराबंद करताना !


पोचलो तेव्हा समुद्राला भरती अशी नव्हतीच, त्यामुळे घळीतून उंच उडणाऱ्या लाटा चित्रबद्ध करण्याचे मनसुबे उधळले होते. परंतु सकाळची वेळ गाठल्याने समुद्राच्या लाटांचे, आजूबाजूच्या खडकांवर आदळतानाचे हवेतसे फ़ोटो घेण्याची संधी मला मिळाली. डाव्या बाजूला थोडा वर आलेला सूर्य समोरच्या खडकांवर आदळणारया लाटांच्या पाठीमागून प्रकाश टाकत होता ! (Back-lit lighting) आदळणारे पाणी चहुकडे उडते, एखाद्या बॉम्ब चा स्फोट झाल्यासारखे. मग ते लहान मोठे थेंब मागाहून येणारया किरणांनी उजळून निघतात , त्यांच्या कडा चंदेरी रंगाने चकाकून निघतात. थोडावेळ निरीक्षण करताच सुयोग्य कंपोझिशन साठी उत्तम जागा सापडते. लाटा समुद्रात कुठे तयार होतात, त्यांना खडकां पर्यंत यायला  लागणारा वेळ, लाटांची तिव्रता, त्यांची मोठा 'स्फोट' करण्याची क्षमता हि सर्व निरीक्षणे पाचेक मिनिटांत पुर्ण करायची. जागा पकडायची, कॅमेरा ची सर्व सेटिंग करून वाट पहायची योग्य लाटेची  !  


Surrounding of the slit
योग्य लाट ओळखावी लागते ! आता कशी ओळखायची हे सांगणं तसं थोडं कठीण आहे. कणेकरांनी सांगितलेली सर ब्रॅडमनची गोष्ट इथे आठवते ती सांगतो ! ब्रॅडमनना कुणा पत्रकाराने विचारलं - "तुम्ही कोणत्या चेंडुवर किती धावा काढायच्या हे कसं ओळखता ? " यावर  त्यांचं फार मार्मिक व विनोदी उत्तर होतं - " गोलंदाजाने चेंडू हातातून सोडला कि तो पहायचा, त्यावर लिहिलेली संख्या वाचायची आणी मग तेवढ्या धावांसाठी तो टोलवायचा, बस  एवढंच !





एका निष्णात सर्फ़र प्रमाणेच फोटोग्राफर ला सुद्धा या लाटा अनुभवानेच ओळखाव्या लागतात ! कोणती लाट आपली हे मात्र आतला आवाज असतो ! काही दिवसांपुर्वी सत्यकथेवर आधारीत एक चित्रपट पाहिला होता - The Soul surfer. राष्ट्रीय स्तरावरच्या सर्फ़िंग स्पर्धे साठी तयारी करताना बेथनी आपला हात शार्क हल्ल्यात गमावते. या प्रसंगावर पात करत, स्पर्धे साठी हिरीरीने तयारी करत असताना तिचे वडिल आणि कोच तिला सांगतात -

“Life is alot like surfing… When you get caught in the impact zone, you’ve got to just get back up. Because you never know what may be over the next wave.”




Sea waves splashing on the rocks
जो पर्यंत वारा लाटा उसळवतोय, सूर्य योग्य प्रकाशयोजना करतोय तोपर्यंत हौस फिटेपर्यंत फ़ोटो काढायचे. हवे तसे फ़ोटो मिळाले की मात्र कॅमेरा बाजूला ठेवायचा, सभोवतालचे वातावरण त्या लाटा फक्त अनुभवायच्या ! आधीची जागा सोडुन पुढच्या सिट मधली जागा पटकावणे अशावेळी उत्तम. शांतपणे बसून मग येणारया प्रत्येक लाटेचं वेगळेपण शोधायचं , तिचा स्पर्श अनुभवायचा , वाढणाऱ्या उन्हांत ते थेंब अंगावर झेलायचे ! पेंढारकरांच्या "रारंगढांग" मधली अवतरणं आठवत समुद्रावरून येणारा थंड वारयाची झुळुक अनुभवावी. वाऱ्याच्या झुळुका, त्या फेसाळणारया लाटा , त्यांना सांभाळून घेणारे किनारे, अभेद्य वाटणारे परंतु र्हुदयात  प्रचंड जागा असणारे खडक, किनारयापासून थोड्या दूर असणाऱ्या मासेमारी नौका, दुरवर दिसणारी गलबतं, पाठीमागे क्षितिजा पर्यंत पसरलेलं निळभोर आकाश, त्यात तरंगणारे पांढरे शुभ्र ढग - आपल्या आयुष्यातल्या बरया वाईट अनुभवांबरोबर जोडुन पहावं. आयुष्याचं तत्वज्ञान समजण्याचा प्रयत्न करावा. विचारमंथनातुन निराश न होता, उलट पक्षी एका नव्या उमेदीने मार्गक्रमण करण्यासाठी सभोवतालच्या निसर्गाकडून उर्जा घ्यावी , पुढे जाण्यासाठी , पूर्वीपेक्षा जास्त जोमाने !




View Larger Map




शासकीय संस्थाचा उदासीनपणा !

Annoyed Look - mix of questions and surprise
वेळणेश्वरहून रस्ता प्रशस्त माळावर येतो आणी परत एक उतरण सुरु होते हेदवी गावाकडे. येथवर चांगला असलेला रस्ता खडबडीत होतो. खड्ड्यांमुळे होणार त्रास सहन करताना, पाठीचा कणा खिळखीळा करण्याची जबाबदारी नक्की कुणी घेतली आहे याचा विचार मनात डोकावला नाही तर नवल. कोकणात पर्यटनाला प्रचंड वाव आहे मात्र MTDC ला याचे काही सोयर सुतक नसावे. केवळ रहाण्याची सोय करणे या पलीकडे या मंडळाची कुठेही ओळख दिसत नाही. स्थळाकडे जाणारे रस्ते सुधारणे, तेथील स्वच्छता ठेवणे, वास्तूंची निगा राखणे, अनुचित प्रकार व नासधूस रोखणे अशी बरीच कामं स्थानिक प्रशासन, पोलिस , पर्यटक आणी MTDC यांच्या सहयोगाने व्हावयास हवीत. MTDC चे कार्य या सर्वांचे समन्वयक म्हणुन व्हावयास हवे. परंतु तसे दिसत नाही व जी काही विकास कामं होतायत ती स्थानिक पुढाकाराने होतात असं एकंदर प्रकर्षाने जाणवत रहाते. असेच औदासिन्य पुरातत्व विभागही दाखवते त्या बद्दल जयगड किल्ल्याच्या लेखात वाचालच ! म्हणा, MTDC ला जाहोरातबाजीही निट करता येत नाही असं दिसतंय ! MTDC च्या वेब साईट वर बरयाचश्या स्थळांची माहितीही धडपणे देण्यात आलेली नाही. इथे कोणतेही दिशादर्शक, अंतर दाखवणारे वा माहिती देणारे फलक नाहीत. एकतर  रहदारी कमी, जवळपास निर्जन रस्ते  आणी अशातच फलकांची वानवा हमखास रस्ता चुकवते. त्यामुळे गुगल वर थोडा गृहपाठ केलेला केव्हाही चांगला. जिथे रस्त्याबद्दल शंका असेल तिथे पश्चात्तापापेक्षा थोडावेळ थांबून का होईना वेळोवेळी विचारणा केलेली बरी !



संग्रहातुन :

पावसाळयात बामणघळीला भेट देणं म्हणजे एक पर्वणी आहे. दगडंवर वाढलेल्या शेवाळापासुन जपत सावकाशीने गेल्यास घळीच्या जवळ जाउन लाटांचं रौद्र रूप बघता येतं ! लाटा घळीत शिरतानाचा व त्या दगडावर  आपटतान होणारा आवाज क्षणभरासाठी धडकी भरवतो !  ढगांनी भरलेलं आकाश समुद्राचं व आसपासचं सौंदर्य मात्र हिरावून घेतं ! खूप वर्षांपूर्वी अशाच एका पावसाळ्यात या भागामध्ये येणं झालं होतं तेव्हा घेतलेले काही फ़ोटो इथे देत आहे ….

तारीख  : जुलै, २००५
कॅमेरा : Nikon E4100

Splashing water in the slit with rumbling sound

Dreadful sea during Monsoon

A typical view of the place during Monsoon

4 comments:

  1. How beautiful!!! I am already a fan of your photography and sometimes I just look at the picture and enjoy its beauty silently! At times, words weigh less that silence!

    Which place is this? BamaNghaL? VeLaneshwar? Could you please write about this place a little in English too? Or at least Hindi is understandable.Because, it would help people like me who doesn't know Marathi...

    Regards,
    Sindhu
    The Arts & Me
    Tantu

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sindhu. It tickles when somebody says I am fan of yours. I appreciate it a lot. I have already told you that your comments and suggestions are helpful to me e.g today's comment ! thanks a ton for that :-)

      Sindhu this is one of those posts which I don't want to write in English. I thought the photos would be enough to describe the place for others. However I agree that for a Non-Marathi traveler, this post is not helpful as far as relevant travelling info is concerned. I am going to write that typical post soon. Please wait for that. :-)

      Delete
  2. Love the pristine beauty of this place.......it looks so untouched. Beautifully captured. Thank you for sharing Paresh.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sruthi. Its indeed a lonely place, hardly visited by the tourists ! and I love such lonely part of the world. Thanks for the visit, comment. Keep watching this space for more !

      Delete

Thank you for visiting !