काही कथा (भाग : ४ ):
एका गरीब, आंधळ्या व वृद्ध स्त्रीला अनेक अडचणी होत्या. त्यांची गरिबी इतकी होती, की त्यांना रोजचं जेवणही मिळत नव्हतं.
तिला एक लग्न झालेला मुलगा होता, मात्र त्याला मूल होत नव्हतं. त्यामुळं ही वृद्ध स्त्री सतत दुःखी असे. ती सतत परमेश्वराची प्रार्थना करत असे, त्याची करुणा भाकत असे. आपली परिस्थिती बदलावी यासाठी उपासतापास, व्रतं, वैकल्यं असे अनेक उपाय ती करत असे.
एक दिवस तिला देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, "मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय हवं ते माग; मात्र एक लक्षात ठेव, तुला फक्त एकच वर मागता येईल."
देवाच्या या आज्ञेमुळं ती स्त्री विचारात पडली आणि काय मागायचं याचा विचार करू लागली. समस्या तर इतक्या होत्या आणि अडचणी तर प्रचंड होत्या; एका वरात सगळं कसं मागायचं? पण ती स्त्री हुशार होती.
तिनं परमेश्वारकडं एकच वर मागितला तो म्हणजे "हे परमेश्वरा, मला माझा नातू आणि नातीला सोन्याच्या ताटलीतून दूधभात खाताना पाहू दे."
एका वरात तिनं परमेश्वराकडे सगळं काही मागितलं. तिला डोळे मिळाले, तिच्या सुनेला मुलं झाली आणि त्या स्त्रीच्या घरात ऐश्वर्य आलं.
एक प्राचीन लोककथा आहे. ज्या वेळी मनुष्याजवळ प्रकाश नव्हता, अग्नी नव्हता त्या वेळची ही गोष्ट आहे.
तेव्हा रात्र मोठी त्रासदायक वाटे. अंधार घालवण्याचे पुष्कळ उपाय लोकांनी शोधले; पण काही उपयोग झाला नाही. कुणी म्हणाले की, मंत्र म्हणा. तेव्हा मंत्रही म्हटले गेले. कुणी सुचवले की प्रार्थना करा तेव्हा आकाशाच्या दिशेने हात उंचावून प्रार्थनाही केल्या गेल्या; परंतु अंधार हटला नाही तो नाहीच.
शेवटी कुणा तरुण तत्त्वज्ञान्याने म्हटले, ''आपण टोपल्यांमधून अंधार भरभरून खड्डय़ांमध्ये फेकून देऊ. असे केल्याने हळूहळू अंधार क्षीण होत जाईल आणि मगच त्याचा अंत होईल.''
ही युक्ती छान होती! सारी रात्र लोक टोपल्यांत अंधार भरायचे आणि खड्डय़ांमध्ये फेकून द्यायचे; पण बघतात तर काय तिथे काहीच नसायचे. शेवटी लोक फार कंटाळून गेले. कारण अंधार फेकून द्यायची एक प्रथाच पडून गेली आणि प्रत्येक माणूस रात्री कमीत कमी एक टोपलीभर अंधार तरी फेकून द्यायला लागला.
पुढे त्यांच्यामधला एक तरुण एका अप्सरेच्या प्रेमात सापडला आणि त्याचा विवाह त्या अप्सरेबरोबर झाला. पहिल्या रात्रीच वधूच्या सासरची जी शहाणी म्हातारी माणसे होती त्यांनी तिला टोपलीभर अंधार दरीमध्ये फेकून यायला सांगितले. ते ऐकून अप्सरा खूप हसायला लागली.
तिने एक शुभ्र वात तयार केली, एका मातीच्या बुडकुल्यात तूप घातले आणि मग दोन गारगोटय़ा एकमेकींवर घासल्या. लोक विस्मयाने पाहतच राहिले. तेवढय़ात आग निर्माण झाली, दिवा जळू लागला आणि अंधार मावळला.
त्या दिवसापासून लोकांनी अंधार फेकून द्यायचे सोडले. कारण ते दिवा पेटवायला शिकले.
प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक आरसाच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या आरशावर धूळ साठत असते. आपला आरसा जसा असेल तसेच आपले ज्ञान असते. ज्या प्रमाणात आपण आरशासारखे असतो त्या प्रमाणात आपल्यातून सत्य प्रतिबिंबित होत असते.
एकदा कोणा एका माणसाने एका साधूला सांगितले, की विचारांच्या अति ताणामुळे त्याला अतिशय त्रास होतो. त्या साधूने त्याला आपल्या एका साधू मित्राकडे निदान आणि चिकित्सा करवून घेण्याकरिता पाठवले. पाठवताना त्याला म्हटले, ''जा आणि त्याची समग्र जीवनचर्या लक्षपूर्वक पाहा. त्यातूनच तुला मार्ग सापडेल.''
तो माणूस गेला. ज्या साधूकडे त्याला पाठवण्यात आले होते त्या साधूवर धर्मशाळेची जबाबदारी होती. तिथे गेल्यावर काही दिवसांपर्यंत त्या माणसाने साधूची दिनचर्या पाहिली; परंतु त्यातून खास शिकण्याजोगे असे काहीच आढळले नाही. तो साधू अत्यंत सामान्य, चारचौघांसारखाच होता. त्याच्यात तर ज्ञानाचे कुठलेच लक्षण दिसून येत नव्हते. तो अत्यंत सरळ होता आणि लहान मुलासारखा निष्पाप वाटायचा. त्याच्या वागण्यात असामान्यपणा असा काहीच नव्हता. त्या माणसाने साधूची सारी दिनचर्या पाहिली.
फक्त रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी जागा झाल्यानंतर तो काय करीत असे हे मात्र त्याला समजले नव्हते. त्याने त्याला ते विचारले. साधूने सांगितले, ''मी तर काहीच करीत नाही. रात्री मी सारी भांडी घासतो आणि त्यांच्यावर रात्री थोडीशी धूळ पुन्हा साठते म्हणून सकाळी ती परत विसळतो. भांडी धुळीने भरलेली आणि घाणेरही नसावीत याकडे लक्ष देणे फार आवश्यक असते. कारण मी या धर्मशाळेचा राखणदार आहे ना.''
अत्यंत निराश होऊन त्या साधूकडून तो माणूस आपल्या गुरूकडे परत आला. त्याने त्या साधूची दिनचर्या आणि त्याच्याशी झालेले संभाषण आपल्या गुरूला सांगितले.
त्याच्या गुरूने म्हटले, ''तू योग्य माणसाला भेटून आला आहेस, पण त्याला समजू शकला नाहीस. रात्री तू आपल्या मनाला घासत जा आणि सकाळी ते पुन्हा त्याला स्वच्छ कर. हळूहळू चित्त निर्मळ होत जाईल.''
चंद्रकांत... मुळातच हुशार. घरात प्रचंड गरिबी. त्याला एक कल्पना सुचली.
मोफतच्या शेणाचे खत तयार करून विकणे ही कल्पना. त्या पैशात नारळ विकत घेऊन देवळाजवळ विकणे, ही बुद्धिमत्ता. तो पैसा बँकेत जमा करणे म्हणजेच उच्च मानसिकता. त्या पैशात शिक्षण पूर्ण करणे म्हणजेच सकारात्मकता.
मनबुद्धीत कल्पना असेल, तर परमेश्वर त्याला कधीच कमी पडू देत नाही. त्याच्या पंखांना बळ देतो. मग झेप घ्यायला आकाशही कमी पडतं.
Note: Stories are collected from internet pages and edited. Stories are published on the blog merely to inspire people. No copyright violation intended.
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !