काही कथा - भाग ५

काही कथा - भाग ५



एकदा एका राजाने आपल्या राज्यातील लोकांना दोन हिरे दाखवले आणि त्यातला खरा हिरा कोणता हे ओळखावयास सांगितले.

पण कोणालाच ते सांगता येईना. शेवटी एक अंध व्यक्ती तिथे आला व म्हणाला, 'मी सांगतो तुम्हाला त्यातील खरा हिरा कोणता तो.' 

अंध व्यक्ती ते दोन्ही हिरे बाहेर घेऊन आला. त्याने ते दोन्ही हिरे थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवले व नंतर तो ते दोन्ही हिरे घेऊन राजाकडे आला व त्याला खरा हिरा दाखवला. राजा आश्चर्यचकित झाला, कारण अंध व्यक्तीनं योग्य हिरा ओळखला होता. 

त्या वेळी त्याला याबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले, 'जो खरा हिरा असतो तो कधीही गरम होत नाही, काच मात्र गरम होते. गरम होऊन ती तडकतेसुद्धा. पण हिरा मात्र तसाच राहतो. म्हणूनच तर तो अनमोल असतो.'











एका मुलाने कृष्णमूर्तींना विचारले, 'आम्हाला खेळण्यात जितका आनंद वाटतो तितका आनंद अभ्यासात का वाटत नाही?' 

त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'एखादी गायिका एखाद्या गावात गाण्याचा कार्यक्रम करण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिचे श्वास झालेले असते, म्हणूनच लोक तिचे गाणे नंतर अनेक दिवस गुणगुणत राहतात. 

बाळा, तुझे शिक्षक जेव्हा त्यांच्या शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा शिकणे हे तुझ्यासाठी खेळण्यातकेच आनंदाचे बनले असेल.'














गोष्ट आहे सीताफळांच्या बिया साठवणाऱ्या एका वयस्कर माणसाची 

अकलूज गावचा हा माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो मुंबईला पुण्याला कामानिमित्त जावं लागतं तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात 



अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं , ' कुठून आणता ही सीताफळं ?' ' तुमचे मळे आहेत का ?' 

कुठले मळे साहेब आम्ही गरीब माणसं लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात झाडं उगवलीत दरीत सारं फुकटच आम्ही फळं गोळा करतो पिकवतो आणि तुम्हाला विकतो 


शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची .' त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात हीव्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी 










एकदा एका राजाकडून काहीतरी प्रमाद घडला आणि त्याचं प्रायश्चित म्हणून एक दिवस याचक होऊन ‌भिक्षा मागण्याची शिक्षा त्यास मिळाली. 

त्याप्रमाणे राजा भिक्षा मागण्यासाठी सकाळी सकाळी राजपथावर आला. त्याचवेळेस समोरून एक भिकारी ही भिक्षा मागायला त्याच वाटेवरून येत होता. त्यानं राजाला पाहिलं. आता राजाकडे भिक्षा मागून आपल्याला आपलं दारिद्र्य कायमचं दूर करता येईल, असा विचार त्याच्या मनात आला. काय मागावं याचा तो विचार करत असतानाच राजा त्याच्यासमोर आला. 

राजानं भिक्षेसाठी हात पुढे केला. राजाचं ते याचकाचं रूप बघून त्या भिकाऱ्यानं आपल्या कर्माला दोष दिला आणि आपल्या झोळीतील चार दाणे राजासमोर टाकले. 

निराशेनं घरी येऊन त्यानं झोळी फेकली. आणि आश्चर्याने तो बघतच राहिला. 


त्याने जेवढे दाणे भिक्षा म्हणून दिले होते, फक्त तेवढेच दाणे सोन्याचे झाले होते! सर्वच दाणे राजाला का दिले नाही म्हणून तो स्वतःच्या नशिबाला दोष देत राहिला.










Note: Stories are collected from internet pages and edited. Stories are published on the blog merely to inspire people. No copyright violation intended.




No comments:

Post a Comment

Thank you for visiting !