काही कथा : भाग ८
एका गावात भिकारी राहत असतो. आपण लग्न करावे, म्हणून तो विचार करतो. अनुरूप पत्नी शोधतो. लग्नासाठी पैसे लागणार त्यासाठी तो उत्तरेकडे पुरून ठेवलेल्या एका कवडीच्या शोधात निघतो.
एका ठिकाणी शोधमोहीम सुरू असताना तिथे राजाची स्वारी येते. राज्याचा पोशिंदा आल्यामुळे सगळे लोक स्वागत करत असतात, पण एवढ्या गर्दीत दोनजण राजाकडे न पाहता खाली वाकून काहीतरी शोधताना दिसतात. हे पाहून राजा आश्चर्यचकित होऊन प्रधानाकरवी भिकारी व त्याच्या भावी पत्नीला दरबारात बोलावून घेतो.
राजा त्या भिकाऱ्याला विचारतो, "सगळे लोक माझे स्वागत करत असताना तुम्ही दोघे तिकडे काय करत होतात?"
त्यावर भिकारी म्हणतो, "मला लग्न करायचे आहे. त्यासाठी मी कवडी शोधत होते. "
राजा विचारतो, " अरे मग त्याला कवडीची गरज काय ? त्याऐवजी मी तुला एक सोन्याचे नाणे देतो."
त्यावर भिकारी नकार देतो. एक एक म्हणत राजा १६ हजार सोन्याची नाणी देऊ करतो. पण भिकारी मान्य होत नाही. अखेरीस राजा म्हणतो की माझे अर्धे राज्य तुला देतो. हे ऐकून भिकाऱ्याची भावी पत्नी म्हणते, "हा राजा लहरी दिसतो. १६ हजार सोन्याची नाणी नाकारल्यानंतरही त्याने अर्धे राज्य देण्याचे जाहीर केले. कबूल करा."
तिचे म्हणणे ऐकून भिकारी होकार देतो. राजाही समाधान व्यक्त करतो. त्यानंतर राजा त्या भिकाऱ्याला म्हणतो, "की आता तू अर्ध्या राज्याचा मालक झाला आहेस. माझ्या बरोबरीने आहेस. चल आपण दोघे जेवण करू."
भिकारी म्हणतो, "ठिक आहे. माझी हरकत नाही. तुम्ही चला पुढे मी आलोच."
राजा पुन्हा आश्चर्याने म्हणतो, "आता तू कुठे निघालास ?"
भिकारी म्हणतो,"माझी कवडी उत्तरकडे पुरून ठेवली आहे. ती शोधून आणतो."
साधारण २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुठल्याशा मालिकेचं शूट सुरू होतं. त्यात मुख्य कलावंत होते लक्ष्मीकांत बेर्डे, अर्थातच लक्ष्या.
मालिकेत लक्ष्याचं शूट सुरू असलं की एंट्रीला अजून अवकाश असलेले कलाकार आराम करत असत.
एकदा लक्ष्याचा सीन सुरू असताना, टीममधल्या दोन कलाकारांनी मेकअप चढवला आणि एंट्रीला अवकाश असल्याने हे दोघेही थेट झोपी गेले. सीनमध्ये असलेल्या लक्ष्याला ही गोष्ट 'दिसली'. दिग्दर्शकाला थांबवून त्याने सरळ पुढे येत दोघांना जागं केलं.
म्हणाला, " तुम्हाला झोपायचं असेल तर चेहऱ्याला रंग चढवण्याआधी झोपा. एकदा हा रंग लागला की असं आडवं व्हायचं नाही. अन्यथा, रंगदेवता तुम्हाला झोपवेल."
No comments:
Post a Comment
Thank you for visiting !