समस्या

 


समस्या - एखाद्या समस्येला हैराण होऊन आपण आपलेच डोके उठवून घेतलेले असते. पण खरंच  समस्या समस्या असते का? नाही. समस्येचे समाधान कसे हि खरी समस्या. जर सरळसोट तोडगा निघत असेल तर ती समस्या कधीच नसते. ती असते एक शुल्लक गोष्ट, बऱ्याचदा चुटकी सरशी सोडवून आपण पूढे  निघून जातो. कालांतराने ती आपल्या इवल्याश्या डोक्यातही राहत नाही. पण अवघड जागेच दुखं मात्र तसं  नसत. खूप विचार करूनही एखादी समस्या सुटत नसेल तर ती  खरी समस्या. हे सोडवासोडविच घोड अडत एका ठिकाणी. आपल्याला दोन निदान सुचलेली असतात. पहिले शक्य असते पण आपल्याला मंजूर नसते. दुसरे शक्य नसते पण आपल्याला मनापासून हवे असते. 

अशीच एक कथा,  जिथे समस्या आणि समाधान एकरूप होऊन गेलेत. 

एक वृद्ध जोडपं होतं. अतिशय वृद्ध. इतके कि सांभाळ करायला नको म्हणून मुलंबाळं , नातेवाईक सर्व सोडून गेलेले. अशा परिस्थितीत जस आयुष्यभर  जपलं, तसंच एकमेकांना सांभाळत हे जोडपं दिवस ढकलत होत. आजीबाई खाट पकडून नसली तरी नवऱ्यापेक्षा धडधाकट होती. वयाचा परिणाम मात्र आजोबावर दिसू लागला होता. दिवसेंदिवस त्यांचा आजार बळावत होता,  वेदना सहन करणं  मुश्किल झालं होतं. शेवटी अंथरुणातून उठणं  सुद्धा बंद झालं. जगणं जड झालं होतं. 

इतके दिवस आजीबाई सर्व करत होत्या, पण शेवटी शरीराला आणि मनाला मर्यादा आहेतच. इतक्या सुंदर आयुष्याचा शेवट असा होऊ नये असं त्यांना वाटत होत. आजीबाईंना आपल्या नवऱ्याचे हाल बघवेनात. अशा जगण्यापेक्षा मेलेलं बरं - हा विचार दिवसेंदिवस पक्का होत होता.  नैसर्गिक मरण तर येत नव्हतं आणि औषधांचा फारसा परिणाम दिसत नव्हता. अर्थात एका दमात मारणं देखील शक्य नव्हतं. शेवटी बाईने निर्णय घेतला - दररोजच्या औषधामध्ये थोडं थोडं विष मिसळून द्यायचं. आणि उरलेले दिवस शक्य तितक्या आनंदात , एवढ्या वर्षांच्या सहजीवनाचा उत्सव साजरा करत जगायचं. 

म्हणता म्हणता बरेच महिने निघून गेले. आजीबाईच्या मनात मात्र आता अपराधीपणाची भावना मूळ धरू लागली होती. एकेदिवशी  तिने ठरवलं - नवऱ्याची माफी मागून, धीर करून, त्याला सर्व खरं खरं सांगायचं. नवरा आपल्याला नक्की समजून घेईल. 

हि सर्व कहाणी ऐकल्यावर नवरा मात्र आजारपण विसरून हसायला लागला. म्हातारीला हा प्रतिसाद निश्चितच अपेक्षित नव्हता. तिला कळत नव्हतं झालं तरी काय?

शेवटी नवऱ्यानेच स्पष्टीकरण दिलं - जसे तुला माझे आजारपण बघवत नव्हते, तसेच मला तुझे कष्ट बघवत नव्हते. आयुष्यभर इतकं केलास माझ्यासाठी आणि संसारासाठी. या उतारवयात तू अजून कष्ट करावेस असं मला मुळीच वाटत नव्हतं. माझ्या मनात देखील अपराधीपणाची भावना आली, परावलंबित्व ती  भावना बळावू लागलं होतं. मग मी ठरवलं, तुला अजून कष्ट द्यायचे नाहीत. 

मरण लवकर येण्यासाठी, तुझ्या नकळत मी औषध सरळ ओतून टाकत होतो. 

उत्तरं प्रश्न बनली कि जास्त त्रास देतात. 




No comments:

Post a Comment

Thank you for visiting !